मंगरुळपीर: शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत मंगरुळपीर शहरात उभारण्यात आलेल्या दोनशेहून अधिक शौचालयांचे हप्ते रखडले आहेत. त्यामुळे पदरचा पैसा खर्चून बांधकाम करणारे लाभार्थी अडचणीत आले असून, अनेकांचे पुढील बांधकाम यामुळे ठप्प झाल्याने स्वच्छ भारत मिशनच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दोन वर्षांपूर्वी शौचालय नसलेल्या कुटूंबांचा सर्वे करण्यात आला आणि त्यांना शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यातील इतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच मंगरुळपीर नगर पालिकेच्यावतीनेही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटूंबांनी शौचालयासाठी अर्ज सादर केले आणि शौचालयांच्या कामांना प्रारंभही करण्यात आला. त्यानंतर राज्यस्तरीय समितीने मंगरुळपीर शहराची पाहणी करून हागणदरीमुक्तीची घोषणाही केली; परंतु परिस्थिती काही वेगळेच दर्शवित आहे. प्रत्यक्षात नगर पालिकेच्यावतीने मंजुरात देण्यात आलेल्या शौचालयांपैकी शेकडो शौचालये अद्यापही पूर्ण झाली नसून, संबंधित कुटूंबे अद्यापही उघड्यावर शौचास जात आहेत. त्याचे कारण म्हणजे शौचालय उभारणीसाठी शासनाकडून जी रक्कम बक्षीस म्हणून लाभार्थींना तीन टप्प्यात वितरित करण्यात येते. ती रक्कमच दोनशेपेक्षा अधिक लाभार्थींना मिळालेली नाही. काहींचे दुसºया टप्प्यातील, तर काहींचे तिसºया टप्प्यातील हप्ते रखडले आहेत. त्यामुळे त्यांना शौचालय पूर्ण करता आले नाही. या संदर्भात पालिकेतील संबंधित विभागाकडे चौकशी केल्यास तुमचा हप्ता बँकेत पाठविल्याचे सांगण्यात येत आणि बँकेकडे धनादेशच आले नसल्याचे लाभार्थींना सांगण्यात येते. या प्रकारामुळे मंगरुळपीर शहरात तरी, स्वच्छता अभियानाचा पार फज्जा पडल्याचे दिसत आहे.