कामरगाव : पशूवैद्यकीय विभागात पट्टीबंधक पदावर ३० वर्षाहून अधिक सेवा दिल्यानंतर मागील वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला वर्ष उलटले तरी, निवृत्त वेतन मंजूर झाले नाही, तसेच इतर उपदानाचे लाभही त्यांना मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे. कामरगाव येथील गोपाळराव किसनराव हिरुळकर हे कामरगावच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात पट्टीबंधक या पदावर कार्यरत होते ते २९ फेबु्रवारी २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले. नियमानुसार त्यांच्या निवृत्ती वेतन मंजुरीची प्रक्रिया तातडीने करून इतर उपदानाचे लाभही त्यांना मिळायला हवे होते; परंतु गोपाळरावांना निवृत्त होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी त्यांचे मासीक सेवानिवृत्त वेतन मंजूर झालेले नाही. तसेच ग्रॅच्युईटीही देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची व कुटूंबाची उपासमार होत आहे. मासिक सेवानिवृत्त वेतन मंजूर न झाल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असून याबाबत वारंवार तक्रारी व निवेदन देवूनही यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट पंचायत समिती कारंजा येथील लिपीकास याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात. संपूर्ण आयुष्य मुके जनावरांची सेवा करण्यात घालविली असून एक वर्ष होवूनही सेवानिवृत्ती वेतन न मिळाल्याने कार्यालयाच्या चकरा मारुन पैसा व वेळ वाया जात असून लवकरात लवकर वेतन न मिळाल्यास कुटूंबासह आत्महत्या करावी लागेल अशी खंत गोपाळराव हिरुळकर यांनी केली आहे
निवृत्तीला वर्ष उलटल्यानंतरही निवृत्ती वेतनासह उपदान प्रलंबित
By admin | Published: April 08, 2017 5:38 PM