उंबर्डा बाजारसह परिसरातील अनेक गावांतील शेतजमिनी कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे या अभयारण्यातील वन्य प्राणी चारा-पाण्यासाठी नेहमीच शिवारात संचार करतात. शिवारात संचार करणारे रोही, हरिण, माकडे, रानडुकरांचे कळप शेती पिकांचे अतोनात नुकसानही करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार निरंतर सुरू असतानाही या प्राण्यांना शिवारापासून दूर ठेवण्यासाठी वनविभागाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत आणि कुंपणही घातले नाही. यंदाही खरीप पिके बहरत असताना वन्य प्राण्यांनी शिवारात धुडगूस घालून तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे उत्पादन घटून आर्थिक नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांना पिकांची रखवाली करण्यासाठी रात्री जीव धोक्यात घालून शेतात जागल करावी लागत आहे.
----------------
वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांनाही धोका
जंगलातील रोही, रानडुक्कर, हरणांचे कळप ऐन जोमात आलेल्या पिकांत हैदोस घालून ही पिके फस्त करीत असल्याने हैराण झालेला शेतकरी रात्री थंडीवाऱ्यात शेतात जागरण करीत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या जिवालाही शेतात खाद्याच्या शोधात वावरणारे विषारी साप, तसेच रानडुकरासारख्या वन्य प्राण्यांपासून धोका आहे. ही बाब लक्षात घेत वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.