लोकमत न्यूज नेटवर्क कोठारी: एरव्ही सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून शेतकरी तुरीची लागवड करतात; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील युवा शेतकरी अनिकेत डिगांबर चौधरी यांनी या पद्धतीला फाटा देत सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून वाल शेंगाची लागवड केली. त्याचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला असून, आता या पिकातून दरवर्षी विक्रमी उत्पादन तो घेत आहे.मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील युवा शेतकरी अनिकेत डिगांबर चौधरी यांची चेहेल-कोठारी शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीत ते सोयाबीन, तूर, मुंग, उडिद ही पारंपरिक पिके घेत होते. तीन वर्षांपूर्वी बदल म्हणून त्यांनी सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीऐवजी दीड एकर क्षेत्रात वाल शेंगाची लागवड केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला. यात त्यांना सोयाबीनचे एकरी सहा क्विंटल उत्पादन होतेच शिवाय वाल शेंगांचेही विक्रमी उत्पादन होते. विशेष म्हणजे आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून वालाच्या शेंगा तोडणीस सुरुवात होते, तर सोयाबीनच्या काढणीनंतर त्यांना रब्बी हंगामातील हरभरा पिकाचीही पेरणीत त्यात करता येते. वालाच्या शेंगाचे उत्पादन साधारण मार्च महिन्यापर्यंत चांगले होते. बियाण्यांसाठी कवडीचाही खर्च नाही अनिकेत डिगांबर यांनी वाल शेंगाच्या पिकाची लागवड करण्यासाठी सुरुवातीला पारंपरिक गावराण बियाण्यांची प्रयोग म्हणून दोन तासात पेरणी केली होती. यातून त्यांना भरघोस उत्पादन झाल्यामुळे त्यांनी त्यातूनच बियाणे काढून पुढे या पिकाचे क्षेत्र वाढविले आणि दीड एकरात पेरणी सुरू ठेवली. त्यामुळे त्यांना बियाण्यांसाठी कवडीचाही खर्च येत नाही. यंदा मात्र वातावरण बदलामुळे अर्धा एकरातील वाल शेंगाचे पीक करपल्याने एकर भरातूनच त्यांचे उत्पादन सुरू आहे. आठवड्याला १० क्विंटलची तोडणी अनिकेत चौधरी यांच्या शेतातील वालाचे पीक चांगलेच बहरदार असून, दर आठवड्याला ते १० ते १२ क्विंटल शेंगाची तोडणी करतात. त्या शेंगा ठोक पद्धतीने बाजारात विकतात. यवतमाळ, अमरावती, वणी, वर्धा, पुसद, अकोला या परजिल्ह्यांसह वाशिम व मंगरूळ पीर येथील बाजारातही ते शेंगांची विक्री करतात. सद्यस्थितीत त्यांना ठोक पद्धतीने केलेल्या विक्रीत ३० ते ३५ रुपये प्रती किलोचे दर मिळत आहेत.
सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून वाल शेंगाचा यशस्वी प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 5:33 PM