कारंजा तालुक्यात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 5:29 PM
कारंजा तालुक्यात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क उंबर्डा बाजार (वाशिम): सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून श्रीकृष्ण रंगराव पुंड (३६) या युवा शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कारंजा लाड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाºया ग्राम दुघोरा येथे शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. कारंजा तालुक्यातील दुघोरा येथील युवा शेतकरी श्रीकृष्ण रंगराव पुंड यांचे कडे ३० एकर शेती असून, या शेतीवर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज काढले आहे. गेल्या आठवड्यात सततच्या पावसामुळे त्यांनी सोंगून ठेवलेल्या सोयाबीनची सुडी ओली झाली. त्यात १७० क्विंटल सोयाबीन सडल्याने त्यांचे अंदाजे ५ लाख रूपयांचे नुकसान झाले . त्यातच त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीवर उपचारासाठी एक ते दीड लाख रुपये खर्च झाला. दुखापतीचा खर्च, तसेच पावसामुळे झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. मृतक श्रीकृष्ण रंगराव पुंड यांचे मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी वडील, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास उंबर्डा बाजार पोलीस चौकीचे जमादार शेषराव जाधव व पो.कॉ. पवन तायडे करीत आहेत.