लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : महाराजस्व अभियानांतर्गत मालेगाव तहसिल कार्यालयात आयोजित विशेष शिबिरात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांनी आपल्या व्यथा मांडल्या. या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न महिनाभरात निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन तालुका प्रशासनातर्फे देण्यात आले. शिबिराला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील २८ कुटूंबातील सदस्यांची उपस्थिती होती. शेतकरी आत्महत्याग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळणे, सातबारावर वारसा चढविणे, बँकेतील कर्ज मिळणे, सिंचन विहीर व घरकुलांचा लाभ मिळणे, निराधार योजनेअंतर्गत दरमहा अनुदान मिळणे, व्यवसायाकरिता दुधाळ जनावरे, शिलाई मशीन मिळणे, स्वयंरोजगाराकरिता मदत मिळणे, मुद्रा लोन, विद्यार्थ्यांची खाजगी शाळेची फी माफ करणे, पिक विमा मिळणे, रेशनकार्ड मिळणे, विद्युत पुरवठा मिळणे इत्यादी समस्या मांडण्यात आल्या. विविध योजनांचा लाभ मिळण्याची मागणी करण्यात आली. सर्वांच्या समस्या नोंदवून महिनाभरात निराकरण करण्याबाबत संबंधित विभागाला सुचना देवून कळविण्यात आले. याप्रसंगी सर्वांना शासनाच्या विविध विभागाच्या वेगवेगळया योजनांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत देण्यात आली.यावेळी निवासी नायब तहसिलदार रवि राठोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी अव्वल कारकून महादेव चिमणकर, रंजना गोरे व इतर कार्यालयीन कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
मालेगाव येथील शिबिरात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांनी मांडल्या व्यथा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 4:21 PM