लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना या संदर्भात शासकीय मदत मिळण्यास मोठा विलंब लागतो. हा विलंब होऊ नये आणि शेतकरी आत्महत्येचा तपास लवकर होऊन संबंधित आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत देणे शक्य व्हावे, या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन आणि मुख्यमंत्र्यांच्या अवर सचिवांची १६ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीनंतर शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास लवकर व्हावा, या दृष्टीने पोलीस विभागाला काही सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तत्काळ मदत देण्यासाठी शेतकरी आत्महत्येचे कारण तत्काळ शोधून, शेतकरी आत्महत्येचा तपास आठवडाभरात पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला दोन दिवसांत अहवालही सादर करावा लागणार आहे. तसेच संबंधित पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्येचा तपास एका आठवड्यात पूर्ण करण्यासाठी पोलीस अधीक्षक वा पोलीस आयुक्तांना दक्षता घ्यावी लागणार असून, या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब जिल्हाधिकार्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा लागणार आहे.
पोलीस विभागाला शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास आठ दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेलाही सहकार्य करावे लागेल. या निर्णयामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कु टुंबांना त्वरित मदत मिळण्यास मदत होणार आहे. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम