लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जलसंधारण विभाग, जिल्हा प्रशासन आणि भारतीय जैन संघटनेमार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम वाशिम अभियानांतर्गत जिल्ह्यात पाच तालुक्यात मिळून ४७ शेततळी, तर एका तालुक्यात २ वनतळे मिळून एकूण ३९ तळ्यांची कामे वर्षभरापूर्वी प्रस्तावित करण्यात आली होती. प्रत्यक्षात यातील केवळ वाशिम तालुक्यातील चिखली येथील शेततकळ्याचे काम पूर्णत्वास गेले असून, परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना सिंचनासाठी त्याचा आधार होत आहे. तथापि, इतर कामे बंद पडल्याने अभियानाचा उद्देश असफल ठरला असून, ही कामे पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.दुष्काळी परिस्थितीवर मात करणे आणि पावसाचा प्रत्येक थेंब जागेवरच अडविण्यासाठी, जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या विविध कामांना प्राधान्य दिले जात आहे. वाशिम जिल्ह्यात जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेच्या पुढाकारातून गतवर्षी ‘सुजलाम सुफलाम वाशिम जिल्हा’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत १८ गावांत जलसंधारणाची शेकडो कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात जिल्ह्यात सहा तालुक्यांत मिळून एकूण ४७ शेततळे आणि २ वनतळे जेसीबी मशीनच्या आधारे खोदली जाणार होती. यात शंभर चौरस लांबी-रुंदी आणि ३ मीटर खोल असे ४६, तर शंभर चौरस मीटर लांबी-रुंदी आणि ४ मीटर खोल अशा आकाराच्या शेततळ्यांचा समावेश होता. तथापि, विविध तांत्रिक अडचणी आणि वाढत्या इंधन खर्चामुळे केवळ एक शेततळे वगळता इतर सर्व बंद पडली. त्यातही मानोरा तालुक्यातील इंझोरी, मंगरुळपीर तालुक्यातील चांभईसह इतर एक आणि कारंजा तालुक्यातील एक शेततळे अर्ध्यावर खोदून बंद करण्यात आले. या कामांसाठी भारतीय जैन संघटनेकडून जेसीबी आणि पोकलन मशीनही उपलब्ध करण्यात आल्या होत्या; परंतु शासनाकडून निर्धारित दरापेक्षा अधिक इंधन खर्चासह इतर अडचणींमुळे ही कामे बंद पडल्याने उद्देश असफल ठरला.
पर्यायी उपाय हवेतसुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत प्रस्तावित शेततळ्यांचे काम प्रामुख्याने निर्धारित दरापेक्षा अधिक इंधन खर्च होत असल्यानेच बंद पडली आहेत. आता ही कामे पूर्ण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासह इतर उपायांची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.