लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान वेगाने राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायती आणि प्रशासकीय यंत्रणाही उत्साहाने ही कामे करीत असून, मंगरुळपीर तालुक्यातील तीन आणि मानोरा तालुक्यातील एका शेततळ्याचे काम ५० टक्क्यांपर्यंम पूर्ण झाले आहे. आता पुढील खोदकामासाठी पोकलेन मशीन आवश्यक असताना त्या उपलब्ध न झाल्याने कामात खोडा निर्माण होत आहे. पाणीटंचाईमूक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या कामांसाठी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणाही झपाटली असून, या अभियानात सुरुवातीला मागे पडलेल्या रिसोड तालुक्यातही सीसीटीची कामे वेगाने करण्यात येत आहेत. याच अभियानांतर्गत जिल्ह्यात ४६ शेततळी आणि ३ वनतळी करण्यात येत असून, यातील मंगरुळपीर तालुक्यात चांभई, पिंपळखुटा, तसेच मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथे सुरू असलेल्या शेततळ्यांचे काम जेसीबी मशीनच्या आधारेच ५० टक्के पूर्ण झाले आहे. आता पुढे शेततळे खोदण्यासाठी पोकलेन मशीनची नितांत गरज असून, जिल्हा प्रशासनाने या संदर्भात बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा यांना पत्र पाठवून ३० पोकलेन मशीन उपलब्ध करण्याची मागणीही केली असून, मशीन उपलब्ध करण्यासाठी बीजेएसच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्नही करण्यात येत आहेत. तथापि, मशीन उपलब्ध होत नसल्याने जलसंधारणाच्या कामांत खोडा निर्माण होत आहे.
‘पोकलेन’अभावी रखडली सुजलाम, सुफलामची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 5:25 PM