लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत नाला खोलीकरण आणि शेततळ्यांच्या कामांत तांत्रिक अडचणी आल्या असताना भारतीय जैन संघटनेकडून (बीजेएस) पुरविण्यात आलेल्या मशीन उभ्या राहू नयेत, यासाठी सिमेंट नाला बांध आणि ढाळीच्या बांधांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात येत आहे. राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून जिल्हा दुष्काळमूक्त करण्यासाठी सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये या अभियानाला सुरुवात झाली आणि या अभियानासाठी बीजेएसने आजवर २८ जेसीबी आणि १३ पोकलन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशीनच्या आधारे जलसंधारणाची कामे प्रशासनाच्या विविध विभागांकडून करण्यात येत आहेत. तथापि, डिझेलचा खर्च वाढत असल्याने काही कामांत तांत्रिक अडचणी आल्याने दर निश्चित करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे जेसीबी मशीन निकामी उभ्या राहू नये, यासाठी सोपी असलेली आणि कमी डिझेल खर्चात होऊ शकणारी काही कामे या मशीनद्वारे करण्यात येत आहेत. त्यासाठी सिमेंट नाला बांध आणि ढाळीच्या बांधाचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, मालेगाव आदि ठिकाणी ही कामे करण्यात येत असून, मानोरा तालुक्यातील काही कामे पूर्णही झाली आहेत.
सुजलाम, सुफलाम अभियान: ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांधाची कामे वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 2:16 PM