लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - गत आठ दिवसांत वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस झाला असून, वाशिम तालुक्यातील सुरकंडी प्रकल्प तुडूंब भरला आहे. यावर्षीच पुर्णत्वास आलेल्या या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. सुरकंडी परिसरातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून सुरकंडी शिवारात गत काही वर्षांपासून लघु सिंचन प्रकल्पाचे काम सुरू होते. यावर्षी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, गत आठ दिवसांत जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हे विहंगम दृष्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत असल्याचे दिसून येते.प्रकल्प तुडूंब भरल्याने यावर्षी रब्बी हंगामात सिंचनाचे स्वप्न साकारण्याच्या शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून फाळेगाव गावाकडे जाणारा पूल पाण्याखाली आला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक तुर्तास बंद झाली आहे.