वाशिम/शिरपूरजैन : जिल्ह्यात जवळपास २00 विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे संत्रा व पपईच्या फळबागा सुकल्या असून, शेतकर्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून रोहित्र नादुरुस्त असून, शेतकर्यांनी आंदोलन केल्यामुळे केवळ ५७ रोहित्र नव्याने आले आहेत. परिणामी, उर्वरित विद्युत रोहित्रांचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण असल्याने शेतकर्यांची झोप उडाली आहे. शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थान परिसरातील फरशी नामक डी.बी. (रोहित्र) चार महिन्यांपूर्वी जळाली. ते अद्यापही दुरुस्त न केल्याने रोहित्रावर अवलंबून असलेल्या ३0 शेतकर्यांच्या शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. शिरपूर येथील फरशी (डी.बी.) रोहित्र हे पावसाळा लागण्यापूर्वीच जून महिन्यामध्ये जळाले. तेव्हापासून या रोहित्रावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांनी वेळोवेळी शिरपूर महावितरण कार्यालयाकडे यासंबंधी तक्रारी दिल्या आहेत; परंतु अद्यापही हे रोहित्र दुरुस्त करण्यात आले नाही. रोहित्राअभावी इब्राहिमखाँ बागवान यांची संत्राची झाडे सुकली आहेत, तर मुख्तारखाँ पठाण, विश्वनाथ भालेराव, ज्ञानेश्वर गावंडे, घिरके, मजहरखाँ अब्दल्लाखाँ यासह ३0 शेतकर्यांच्या शेतातील तूर व इतर पिके विजेअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी पुरते त्रस्त झाले आहेत. संबंधितांकडे तक्रार करूनही महावितरण कंपनी लक्ष देत नसल्याने वीज कंपनीबाबत शेतकर्यांत रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात जवळपास २00 रोहित्र बंद आहेत. विद्युत रोहित्र उपलब्ध करण्याबाबत वाशिमच्या वितरण कार्यालयाने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. ५७ नवीन रोहित्र मिळाले आहेत.
नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे सुकल्या फळबागा
By admin | Published: October 07, 2015 2:23 AM