शेलूबाजार : यंदा शेलूबाजार परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाचा प्रयोग केला असून, सध्या उन्हाळी मूग चांगलाच बहरला आहे.
मागील काही वर्षांपासून शेतकरी खरीप पिकांबरोबर रबी पिके मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मुगाचा पेरा केला होता. मात्र, ऐन काढणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्यामुळे हाती येणारे उत्पन्न निसर्गाने हिरावून नेले. खरिपामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यंदा लाठी, हिरंगी परिसरात २०० एकरच्या जवळपास भागवत सुर्वे, कैलास सुर्वे, संतोष सावके, गजानन सावके, हर्षद सावके, तेजस सुर्वे, आनंदा सावके, श्रीकृष्ण लुंगे, गणेश राऊत, ऋषीकेश सुर्वे, गोपाल सुर्वे या शेतकऱ्यांनी मुगाचा पेरा केला आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीतून ही पिके बचावली आहेत. उन्हाळी मुगाचे पीक हे ६५ ते ७० दिवसांचे असून एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पन्न मिळू शकते. गतवर्षी उन्हाळी मुगाला ८ ते ९ हजार रुपये क्विंटल दर होता. यंदा तोच दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. हे दर मिळाले तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. आजघडीला सदर पीक शेंगांनी बहरले आहे. उन्हाळी मुगाच्या पिकाला अंदाजे एकरी ९ ते १० हजार रुपये एवढा खर्च लागतो. शेलूबाजार परिसरातील शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करून जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांचे लक्ष वेधतात.