लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोयाबिन पिकाची पेरणी साधारणत: जून-जुलै या महिन्यात केली जाते आणि आॅक्टोबरअखेर सोयाबिनची काढणी प्रक्रिया राबविण्यात येते. असे असताना सोमठाणा (ता.मालेगाव) येथील शेतकरी निंबाजी खंदारे यांनी मात्र प्रयोगशिलतेचे आगळावेगळे उदाहरण समोर ठेवत त्यांच्या संत्रा बागेत आंतरपिक म्हणून चक्क फेब्रूवारी महिन्याच्या सुरूवातीला सोयाबिनची पेरणी केली. विशेष म्हणजे योग्य नियोजनामुळे सद्या हे पीक चांगलेच बहरले असून जिल्ह्यात हा विषय कुतूहलाचा ठरला आहे.सोयाबिन हे जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक असून सोमठाणा येथेही सर्वच शेतकऱ्यांकडून सोयाबिनची पेरणी केली जाते. दरम्यान, शेतकरी निंबाजी खंदारे यांनी आॅक्टोबर २०१९ या महिन्यात सोयाबिनचे पीक घेतल्यानंतर दोन एकर शेतीत संत्र्याच्या झाडांची लागवड केली. सद्या झाडे लहान असली तरी त्यास पाणी द्यावेच लागत आहे म्हणून त्यांनी आंतरपीक म्हणून फेब्रूवारी महिन्यात पुन्हा सोयाबिनची पेरणी केली. सद्या सोयाबिनचे पीक फुलधारणेच्या अवस्थेत असून उन्हाळी सोयाबिन पाहण्यासाठी त्यांच्या शेतीत इतर शेतकरी आवर्जून हजेरी लावत आहेत. आता एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानात सोयाबिनपासून नेमके किती उत्पन्न हाती पडते, याची प्रतीक्षा असल्याचे शेतकरी खंदारे यांनी सांगितले.
एकाच हंगामात घेतले दोनवेळा उत्पन्नमसला खुर्द (ता. वाशिम) येथील भागवत धनगर या शेतकºयाने खरीप हंगामात पेरलेले सोयाबिन आॅक्टोबर २०१९ मध्ये काढून घेतले. त्यानंतर काहीच दिवसानंतर त्यांनी शेत मशागत करून पुन्हा दोन एकर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी केली. त्यापासून एकरी ७ क्विंटलचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती मसला येथील शेतकरी भागवत धनगर यांनी दिली.