लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सलग पाच दिवसांपासून कडक ऊन तापत असून, २३ मे रोजी तापमानाने ४३.५ अंश सेल्सिअसपेक्षा उच्चांक गाठला आहे. उन्हापासून आरोग्य जपा, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.अंगाची काहिली करणाऱ्या उष्णतेची दाहकता दिवसागणिक कमालीची वाढत आहे. लॉकडाउन व संचारबंदीतून शिथिलता मिळाल्यानंतर, तापत्या ऊन्हामुळे दुपारी २ वाजतानंतर वाशिमसह सहाही शहरांतील रस्त्यांवर सामसूम दिसून येते. दरम्यान उष्माघाताशी दोन हात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले. सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याची नोंद होत आहे. परिणामी जिल्हावासीयांच्या अंगाची काहीली होत आहे. आग ओकणाºया सूर्यामुळे जिल्हावासी होरपळत असल्याचे दिसून येते.
वाढत्या उन्हात फार काळ कष्टाची कामे टाळावी, कष्टाची काम सकाळी, संध्याकाळी अथवा तापमान कमी असेल तेव्हाच उरकावी उष्णता शोषून घेणारे कपडे (काळे, लाल अथवा भडक रंगाचे) टाळावे, जलसंजिवनीचा वापर करावा, भरपूर पाणी व लिंबु साखर पाणी प्यावे, असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी दिला. तीव्र उन्हाचा सर्वाधिक त्रास डोळ्याला तसेच त्वचेला जाणवतो. उन्हाळ्यात बाहेर पडताना त्वचा व डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता गृहित धरून नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्वचा, डोळे कोरडे पडू शकतात, नागरिकांनी त्वचेची काळजी घ्यावी, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विठ्ठल गोटे यांनी दिला.