लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेला २० नोव्हेंबरपासून तर बारावीच्या पुरवणी परीक्षेला २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. मार्च-एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येते. यंदा कोरोनामुळे पुरवणी परीक्षा केव्हा होणार? याकडे लक्ष लागून होते. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) २२ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२० या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२० या कालावधीत होत आहे. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रांभोवती कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात जिल्हा दंडाधिकाºयांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परीक्षा केंद्रांवर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही प्रवेशास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर २०० मीटरचे आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील. एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडीओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर व इतर प्रसारमाध्यमे वापरण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिला.
२० नोव्हेंबरपासून दहावीची पुरवणी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 4:26 PM