वाशिम : देशातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या मार्गाने ११०० ते १३०० कि. मी. चे अंतर पार करावे लागत आहे. यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा वायुसेनेच्या हवाई दलामार्फत करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांना पत्राव्दारे केली आहे.
संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलरोजी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना, वायुसेनेमार्फत ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा रस्त्यांच्या मार्गाने आणल्यास ११०० ते १३०० कि. मी. चे अंतर पार करावे लागते. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर येण्यासाठी बराच कालावधी लागतो. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या पाहता, ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा वायुसेनेच्या हवाई दलामार्फत करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांना पत्राव्दारे केली आहे.