लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या विधवा पत्नीला राज्य शासकीय कर्मचारी समुह अपघात विमा योजनेंतर्गत वार्षिक वर्गणीपोटी १० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे. वाशिम जिल्ह्यात या योजनेंतर्गत लाभ मिळण्याचे हे पहिलेच प्रकरण असून, या योजनेमुळे सदर कुटूंबाला मोठा आधार मिळाला आहे. ही रक्कम मृतक शिक्षक संजय नवघरे यांच्या पत्नीच्या खात्यावर जमा झाली आहे. मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक पंजाबराव नवघरे यांचा १८ नोव्हेंबर २०१८ रोजी अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेतंर्गत सहभागाचा अर्ज केला असल्याने त्यांच्या वेतनातून या योजनेपोटी वार्षिक वर्गणी म्हणून ३५४ रुपयांची कपात झाली होती. सदर योजनेनुसार अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाºयाच्या वारसांना शासनाकडून १० लाखांची रक्कम विमाभरपाई म्हणून दिली जाते. त्या अनुषंगाने गोकसावंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सोनुने यांनी पंजाबराव नवघरे यांचा विमादावा विमा संचालनालय मुंबइकडे मुख्याध्यापक या नात्याने दाखल केला होता. विमा दावा दाखल केल्यानंतर विमा संचालनालयकडून मागणी करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुख्याध्यापकांनी करून दिली. त्यानंतर २० जुलै २०१९ रोजी पंजाबराव नवघरे यांच्या वारस तथा विधवा ज्योती पंजाबराव नवघरे यांच्या खात्यात १० लाख रुपयांची विमा रक्कम जमा झाली आहे. या सर्व प्रक्रियेत मुख्याध्यापक गजानन सोनुने यांना रेगाव जिल्हा परिषद शाळेचे तंत्रस्नेही मुख्याध्यापक शंकर तांदळे यांचे सहकार्य लाभले. अपघातात मृत्यू झाल्याने संजय नवघरे यांचे कुटुंब निराधार होऊन उघड्यावर पडण्याची शक्यता होती; परंतु सदर शिक्षकाने समुह अपघात विमा योजनेत सहभाग घेतल्याने त्यांच्या कुटूंबाला मोठा आधार मिळाला आहे.
समुह अपघात विम्यामुळे मृत शिक्षकाच्या कुटुंबाला मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 3:29 PM