वाशिम : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत २०२२-२३ मध्ये नुतनीकरण आणि नवीन अर्ज मिळून १९३८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १२६७ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. या घटकातील इयत्ता ११ वी, १२ वी व इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले जात आहे.
२०१६-१७ पासून योजना सुरु करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँकखात्यात रक्कम जमा केले जाते. सन २०२२-२३ मध्ये प्राप्त एकूण १९७८ अर्जामधून सन २०२२-२३ मधील अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज सादर केलेल्या परंतु, प्रवेश न मिळालेल्या ७२४ तसेच याच वर्षात नुतनीकरणासाठी पात्र ५४३ विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या प्राप्त निधीमधून योजनेची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
४२४ अर्ज ठरले अपात्रस्वाधार योजनेच्या लाभासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. पात्रतेनुसार विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना अर्थसहाय्य दिले जाते. २०२२-२३ मध्ये नुतनीकरण आणि नवीन अर्जांपैकी ४२४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३४७ अर्ज हे नवीन आहेत.
२८६ अर्ज त्रुटीतभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतर्गंत २०२२-२३ मध्ये प्राप्त झालेल्या एकूण अर्जापैकी २८६ अर्ज त्रुटीत आहेत. ज्या विद्यार्थ्याचे अर्ज अद्याप त्रुटीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी पुढील दहा दिवसांत त्रुटींची पुर्तता करुन घेणे आवश्यक आहे.