विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा लोणी बु.चे व्यवस्थापक हे ११ एप्रिलपासून आजारी रजेवर आहेत. बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने प्रतिनियुक्तीवर व्यवस्थापक नियुक्त करणे आवश्यक होते. परंतु तसे न केल्यामुळे लोणी बु., लोणी खु., असोला, मोप आदी गावातील अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा होणे तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरले त्यावरील व्याज, वाढीव रक्कम मिळणे, नवीन पीक कर्ज वाटप प्रलंबित आहे. खरीप पेरणीपूर्व नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आदी खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच पेरणीपूर्वी मशागतीची शेतीची कामे करण्यासाठी पीक कर्ज आवश्यक असून, बँक व्यवस्थापनाने प्रतिनियुक्तीवर शाखा व्यवस्थापक नियुक्त न केल्याने लोणी बु. व परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याप्रकरणी लोणी बु. ग्रामपंचायतचे सदस्य विनोद बोडखे यांच्यासह शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ९ वाजता बँकेच्या रोखपाल यांना घेराव घालून निवेदन सादर केले. यामध्ये पाच दिवसाचे आत कर्जवाटप सुरू न केल्यास बँकेला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला.
पीक कर्जासाठी बँकेला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 5:07 AM