संतोष वानखडे/बबन देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/मानोरा : जिल्हा खनिकर्म विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना मिळालेला नसताना, मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) येथे ३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने शनिवारी उघडकीस आणताच महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने अहवाल मागविला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी टेरका येथील घटनास्थळाची पाहणी केली.गौण खनिज उत्खनन किंवा खनिपट्टा मिळण्यासाठी शेतजमीन अकृषक परवाना, ग्राम पंचायतचा ठराव, ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र, पर्यावरण विभागाची परवानगी यासह जवळपास २९ अटींची पुर्तता करावी लागते. मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) या उजाड गाव परिसरात कोणताही परवाना किंवा आदेश मिळण्यापूर्वीच गौण खनिज उत्खनन केले जात आहे.यासंदर्भात हट्टी ता. मानोरा येथील पृथ्वीराज उल्हास राठोड यांनी मानोरा तहसिलदार तसेच जिल्हा खनिकर्म विभागाकडे तत्कार केली तसेच माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली. गट क्रमांक १७/१ व १७/२ चा खनिपटा मिळण्याबाबतचा अर्ज जिल्हा खनिकर्म कार्यालयास प्राप्त झाला असून सदर प्रकरणात अद्यापपर्यंत आदेश पारीत झालेला नाही तसेच या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना देण्यात आलेला नाही, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. कोणताही परवाना मिळालेला नसताना, तेथे ३०० पेक्षा अधिक क्षमतेची टीपीएच क्रेशर मशीन बसविण्यात आली, दगड उत्खनन करण्यासाठी ब्लास्टिंग मशीन व पाच ते सहा मोठ्या पोकलेन, दोन मोठे जनरेटर, अंदाजे २५ ते ३० मोठे टिप्पर असून, ३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन केल्याची तक्रार पृथ्वीराज राठोड यांनी तहसिल कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली. परंतू, यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. यासंदर्भात लोकमतने ३१ ऑगस्टच्या अंकात सचित्र वृत प्रकाशित करताच, महसूल यंत्रणेत एकच खळबळ उडाली. वरिष्ठांच्या निर्देशानुसार तपासाची चक्रे जलदगतीने फिरली असून, शनिवारी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हा अहवाल उपविभागीय अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.
टेरका येथील गौण खनिज उत्खनन परिसराची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 3:44 PM