लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : तांदळाची वाहतूक करणारा एम. एच. ४० ए.के. ६१४४ क्रमांकाचा ट्रक पोलीस चमूने पांगरखेडा-चांडस मार्गावर ३१ जुलैच्या रात्रीदरम्यान ताब्यात घेतला. हा तांदूळ रेशनचा असल्याची शंका असून, याप्रकरणी पोलीस विभागाने पुरवठा विभागाशी १ आॅगस्ट रोजी पत्रव्यवहार केला.सध्या जिल्ह्यात तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येते. तीन, चार प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत. ३१ जुलैच्या रात्री शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पांगरखेडा ते चांडस मार्गावर एम एच ४० ए के ६१४४ क्रमांकाच्या ट्रकमधून तांदळाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांना माहिती दिली. वरिष्ठांच्या सुचनेनुसार वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष जवंजाळ, शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, जमादार दामोदर इप्पर व चमूने पांगरखेडा ते चांडस मार्गावर हा ट्रक पकडून पुढील चौकशीसाठी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आला. ट्रकमधील तांदूळ हा रेशनचा आहे की नाही याबाबत पोलीस विभागाने पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला. पुरवठा विभागाच्या तपासणीनंतर तांदूळ नेमका कोणता हे स्पष्ट होणार आहे.
ट्रकमध्ये किती क्विंटल तांदूळ आहे, हा तांदूळ रेशनचा आहे की नाही याबाबत पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला. पंचनामा झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.- समाधान वाठोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिरपूर जैन