अनसिंग (जि. वाशिम) : अवैधरीत्या गुटखा पुडी विक्रेत्यावर होणारी कारवाई दडपण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणारे अनसिंग पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रशेखर कदम यांना ८ जून रोजी पोलीस महानिरीक्षकांनी निलंबित केले. यापूर्वी याच प्रकरणातील पोलीस शिपाई किशोर मारकड यांना २६ जून रोजी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी निलंबित केले होते . गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात पाच हजाराच्या लाचेची मागणी करणार्या अनसिंग ठाणेदार चंद्रशेखर कदम याच्यासह तिघांविरूद्ध वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ जून रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वारला येथील संतोष पांडुरंग नप्ते हा आपल्या पानपट्टीमध्ये देशी दारू व गुटखा पुड्यांची अवैधरीत्या विक्री करत असल्याची माहिती अनसिंग पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी नप्ते याच्या पानपट्टीवर १३ जून रोजी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांना गावठी देशी दारूच्या बॉटल व गुटख्याच्या २५ पुड्या आढळून आल्या. तथापि, पोलिसांनी नप्ते याच्याविरूद्ध केवळ मुंबई दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून गुटखा विक्रीप्रकरणी कारवाई न करण्यासाठी पाच हजाराची मागणी केली होती. पानपट्टीधारक नप्ते याने अनसिंग पोलीस पाच हजाराच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार व संभाषणाची रेकॉर्डींंग अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. या तीन आरोपीपैकी गजानन राऊत यांना तत्काळ ताब्यात घेतले होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व पोलीस शिपाई किशोर मारकड फरार होते. यापैकी पोलीस शिपाई किशोर मारकड यांना पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी २६ जून रोजी निलंबित केले होते आता ८ जून रोजी पोलीस महानिरीक्षक उगळे यांनी निलंबित केले आहे.
अनसिंग ठाणेदार कदम निलंबित
By admin | Published: July 10, 2015 1:22 AM