वाशिम, दि. २३- शेतकरी कर्जमाफीसाठी विधिमंडळात गदारोळ घातल्यामुळे रिसोड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांना निलंबित करण्यात आले. या प्रकाराबाबत गुरुवारी जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांंमधून तीव्र पडसाद उमटले. मालेगाव येथे रास्ता रोको, तर रिसोड येथे निषेध सभा घेण्यात आली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, पीक कर्जमाफी आणि शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळात गदारोळ घातल्याचे कारण समोर करून १९ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये अमित झनक यांचाही समावेश आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात विधिमंडळात आवाज उठविणार्या विरोधी आमदारांनाच निलंबित केले जात असेल, तर ही संपूर्ण शेतकर्यांची क्रूर थट्टा असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस-राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांंनी व्यक्त केल्या. मालेगाव येथे शेलुफाटा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. रिसोड येथेही निषेध सभा घेण्यात आली. रायुकाँचे जिल्हाध्यक्ष अनंतकुमार काळे यांनी १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. निलंबन मागे न घेतल्यास जिल्ह्यात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
झनकांच्या निलंबनाचे जिल्ह्यात तीव्र पडसाद
By admin | Published: March 24, 2017 2:27 AM