मालेगाव : गत काही वर्षांपासून इ-क्लास जमिनीवर पेरणी केलेल्या अतिक्रमकांना न्याय द्यावा तसेच पेरलेल्या पिकांच्या नोंदी घ्याव्यात या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अतिक्रमकांसह मालेगाव तहसिल कार्यालयावर धडकले.मालेगाव तालुक्यात गत काही वर्षांपासून भूमिहीन, गोरगरीब कुटुंब इ-क्लास जमिनीवर सोयाबीन, तूर, ज्वारी, कपाशी व अन्य पिके घेऊन उदरनिर्वाह करीत आहेत. काही ठिकाणी या पिकांमध्ये जनावरे सोडून नासाडी करण्याचे प्रकार घडत असल्याने गोरगरीब कुटुंब भयभीत झाले आहे. वर्षानुवर्षे इ-क्लास जमिनीवर पेरणी केलेल्या अतिक्रमकांना न्याय द्यावा तसेच तलाठ्यांनी या पिकांची मोका पाहणी करून नोंद घ्यावी, अशी मागणी स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष महादेव धवसे यांनी केली. उदरनिर्वाह म्हणून भूमिहीन कुटुंबांकडून इ-क्लास जमिनीवर पीक पेरणी केली जात असताना, काही जणांकडून पिकांत गुरे सोडून दिली जातात. शासन नियमानुसार अतिक्रमकांना न्याय द्यावा, अशी मागणी धवसे यांनी केली. यावेळी नायब तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महादेव धवसे, सुधाकर तायडे, संभाजी लोखंडे, देवानंद करवते, लालखाभाई, राजाराम पवार, शांतीराम शेळके, समाधान ससाने, वामन जाधव, रामकृष्ण तायडे, सुभाष शिंदे, अरूण गोदमले, प्रकाश कांबळे, शोभा पवार, मणकर्णा व्यवहारे, सुमन नाईक, रूख्मिना ढोके, चंद्रभागा इंगळे, अनुसया ठोंबरे, रेणुका पवार, अनिता मैघने, शेख आशा बी, केशव सदांशिव, पांडुरंग नागरे, सुखदेव जामकर, भगवान लोखंडे, अनिल मैघणे, भगवान डाखोरे, गंगाधर शिंदे, पांडुरंग नाईक, प्रदीप गोदमले आदींची उपस्थिती होती.
पिकाच्या नोंदी घेण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकनचे पदाधिकारी धडकले मालेगाव तहसिल कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 2:44 PM