लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असून यामुळे शेतकऱ्यांना पुरता भ्रमनिरास झाला आहे. सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती माजी खासदार तथा ‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी यांनी येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तालुक्यातील शिरसाळा येथे सभा पार पडली. त्यापुर्वी शेट्टी यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, राज्यात अद्यापपर्यंत शासकीय दराने तुर खरेदीस सुरूवात झालेली नाही. केंद्र सरकारने तुरीच्या आयातीत ४६ टक्के वाढ केली आहे. बाहेरुन तूर का आयात केली जाते, याचा जाब राज्य शासनाने केंद्राला विचारायला हवा. तसेच महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी व मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, असे ते म्हणाले. शेतकºयांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण राज्यात संघटनेची पुर्नबांधणी करित असून त्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ३० सप्टेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकºयांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.याप्रसंगी संघटनेचे रविकांत तुपकर, दामुअण्णा इंगोले, अमोल हिप्परगे, प्रकाश पोहळे, घनशाम चौधरी उपस्थित होते. दामुअण्णा इंगोले यांची शेतकरी स्वाभीमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी यावेळी दिली.
सरसकट कर्जमाफीसाठी स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 3:19 PM