काजळेश्वर येथे कोरोणा संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्याने, ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, सर्व सहयोगी कर्मचारी तथा प्रशासनाचे वतीने गावचे प्रशासक पुंडलिकराव देशमुख यांनी कोरोनाची साखळी तुटावी, याकरिता जास्तीतजास्त कोरोनाविषयक चाचण्यावर भर दिला. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस पाटील, आंगणवाडीसेविका, आशावर्कर, बचत गटाच्या महिला, महसूल कर्मचारी, कृषी सहायक, प्राथमिक तथा विद्यालयाचे शालेय कर्मचारी; पोलीस धडपडत आहेत. अशातच प्रत्येकाने स्वत:चे व कुटुंबाचे संरक्षण व्हावे, याकरिता कोरोना चाचण्या करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन सहकार्य करावे, तसेच दुकानदार, ऑटो चालक, चक्की चालक, रेशन दुकानदार, प्रत्येक व्यावसायिक यांनी स्वत:ची चाचणी करून द्यावी, तोंडावर व्यवस्थित मास्क बांधावा, सुरक्षित अंतर, वारंवार हात धूत सॅनिटायझर वापर करून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, पात्र असणाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे व प्रशासनास मदत करीत घरातच थांबून कोरोनापासून स्वत:ला व कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन प्रशासक पुंडलीकराव देशमुख यांनी काजळेश्वरवासीयांना केले आहे. शुक्रवारी पार पडलेल्या कोरोना चाचणी शिबिरात तहसीलदार कारंजा यांचे मार्गदर्शनात ८२ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. यावेळी गावचे ग्रामसचिव सतीश वारघट तलाठी संजय आडे, मंडळ अधिकारी देवानंद कटके, कृषी सहायक चंदन राठोड, प्राथ. तथा विद्यालयीन कर्मचारी, पोलीस पाटील शीतल सचिन हाते, अंगणवाडी, आशा, बचत गटाच्या महिला इत्यादींनी कार्य केले.
००
कोट:
सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसताच, आरोग्य विभागाशी संपर्क करावा व स्वत:चे व कुटुंबाचे रक्षण करावे.
- डॉ.प्रशांत वाघमारे
नोडल आरोग्य अधिकारी कारंजा