वाशिम शहरातील गुलाटी ले-आऊट, सिव्हील लाईन्स भाग तसेच अकाेला रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ नगरात गत काही दिवसांपासून चाेर येत असून वाहनांची तोडफोड, कुंपण भिंतीवरून घरात शिरण्याचा प्रयत्न हाेत असल्याचे काही नागरिकांनी घरासमाेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद झाले आहे. नागरिकांनी ही बाब व्हाॅट्सॲप व्दारे काॅलनीतील नागरिकांना कळविली. तसेच व्हिडिओसुध्दा एकमेकांना शेअर केलेत. तेव्हा समर्थ नगरातील नागरिकांनी बैठक घेऊन रात्रीची गस्त घालण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार दरराेज ५ ते ६ जणांचे पथक तयार करून हातात लाठी-काठी घेऊन काॅलनीवासी रात्रीच्यावेळी गस्त घालत असल्याचे दिसून येत आहे. या भागात दरराेज रात्री काही महिन्यांपूवी पाेलिसांची पॅट्राेलिंग राहायची. काॅलनीमध्ये एक नाेटबुक ठेवून किती वाजता भेट दिली याची नाेंद कर्तव्यावर असलेले पाेलीस करायचे, परंतु अनेक महिन्यांपासून हे बंद झाल्याने काॅलनीतील नागरिकांवर दिवसा नाेकरी व रात्रीच्यावेळी गस्त घालण्याची वेळ आली आहे.
पाेलीस प्रशासनाने या चाेरांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
................
शिक्षक बनले चाैकीदार
अकाेला रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ नगरामध्ये गत तीन दिवसांपासून चाेर येत असल्याने काॅलनीतील रहिवाशांनीच रात्रीची गस्त सुरु केली आहे. यामध्ये अनेक शिक्षकांचा समावेश दिसून येत आहे. दिवसा शिक्षक व रात्री चाैकीदार अशी परिस्थिती या भागातील नागरिकांची झाली आहे. तसेच अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्ल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे
..........