वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून याकरिता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी नियमांची शहरी व ग्रामीण भागात काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ५ मे रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. तसेच एखाद्या गावामध्ये गर्दी होणारा कार्यक्रम होवूनही संबंधितांवर कारवाई न झाल्यास संबंधित गावस्तरीय कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राम मुळे यांच्यासह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील काही गावांमध्ये अजूनही लग्न समारंभ, अंत्यसंस्कार प्रसंगी गर्दी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्तरीय समित्या, गावस्तरीय कर्मचारी यांनी अधिक सतर्क राहून गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच कोणीही असा कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी. सर्व संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी गावस्तरीय कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाईचा अहवाल दैनंदिन स्वरुपात घ्यावा. संचारबंदी नियमांच्या अंमलबजावणीत कुचराई केल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात ज्या भागामध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे, अशा भागामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचे नियोजन करावे. त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास संबंधित डॉक्टरांनी रुग्णाला कोरोना चाचणीसाठी नजीकच्या चाचणी केंद्रावर पाठविणे बंधनकारक आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील डॉक्टरांकडून कार्यवाही केली जात असल्याचा आढावा संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी नियमितपणे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे म्हणाले, जिल्ह्यात आठवडी बाजारांना बंदी असून कोणत्याही गावात, शहरात आठवडी बाजार भरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली.