वाशिम : शहरात तब्बल ६ वर्षांनंतर जुलै महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. शहरवासीयांना गेल्या १० दिवसांपासून उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. अशा तापदायक वातावरणामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. जुलै महिन्यात पावसाळी वातावरण असल्याने शक्यतोवर नागरिकांना घामाघूम होण्याची वेळ येत नसते. यंदा पावसाने दडी मारल्याने वातावरणात गारवा नाही. उन्हाळ्यासारखे तापमान आहे. जिल्ह्यात १ जुलै २०१४ मध्ये ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान राहिले; परंतु तब्बल ६ वर्षांनंतर यंदा जुलै महिन्यात पुन्हा एकदा कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांवर गेला. शहरात १० जुलै रोजी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाअभावी तापमानवाढीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ढगाळ वातावरणात उकाड्यामुळे घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे.
------
असा मोडला ‘जुलै’चा रेकॉर्ड
वर्ष ----कमाल तापमान
२००१ - ३२.०
२००५ - ३४.६
२०१० - ३५.२
२०११ - ३४.५
२०१८ - ३५.४
२०२०-३३.६
२०२१-३७.२
----
सरासरी तापमानात तीन अंशांची वाढ
जुलै महिन्यात यंदा सरासरी तापमानात तीन अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. एप्रिल महिन्याप्रमाणे जुलैमध्ये तापमानाची नोंद होत आहे.
------
आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज
मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणात वाढलेला उकाडा कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
------
आरोग्य सांभाळा
गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. तापमानात वाढ होत असल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे, सकस आहार घ्यावा.
- डॉ. सचिन पवार
------
मान्सून पुन्हा सक्रिय
जुलै महिन्यात शक्यतोवर वातावरणात गारवा असतो. यंदा जुलै महिन्यातही उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. पुढचे १२ दिवस पावसाचे आहेत. त्यामुळे सध्या होणारी लाहीलाही शांत होईल.
- डॉ. नीलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ