वाशिम: आरोग्य विभागाच्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या क्षयरुग्ण शोध मोहिमेला आता खाजगी डॉक्टर आणि औषधी विक्रेत्यांचा आधार मिळणार आहे. याबाबत खाजगी डॉक्टर व औषध विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कारंजा येथील क्षयरोग पथकाच्यावतीने जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बुधवारी सायंकाळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याला कारंजा तालुक्यातील मान्यवर डॉक्टर व खाजगी औषध विक्रेत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांच्याद्वारे एकदिवसीय खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा क्षयरोग पथक कारंजा यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आयएमएचे कारंजा शाखा अध्यक्ष डॉ. आसिफ अकबानी, तसेच प्रमुख मार्गदर्शक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोनकर, उपजिल्हा रुग्णालय कारंजा वैद्यकीय अधीक्षक डॉ. साळुंके व निमा संघटना अध्यक्ष डॉ. रागिब खान डॉ. शार्दुल डोणगांवकर उपस्थित होते, दरम्यान जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोनकर यांनी क्षयरोग आजाराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरोग निर्मुलनासाठी जास्तीत जास्त सहकार्य करावे. यासाठी आपल्याकडील तपासणी आढळणाऱ्या क्षयरुग्णांंची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला द्यावी. त्याशिवाय खाजगी औषधी विक्रेत्यांनीही त्यांच्याकडे विकल्या जाणारी एच-१ शेड्युल अंतर्गत क्षयरोगावर उपचारासाठी औषधी नेणाºया रुग्णांची माहिती विहित नमुन्यात जिल्हा क्षयरोग केंद्राला द्यावी असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्थाविक अशोक भगत (डीपीस) यांनी केले व समारोप सूत्रसंचालन क्षयरोग पर्यवेक्षक मंगेश पिंपरकर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जयकुमार सोनुने (पीपीम कॉर्डिनेटर)अब्दुल रहिम, क्षयरोग पर्यवेक्षक राजेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.