लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :जन्मत: अंध असतानाही लाचारीचे जीवन न पत्करता बालपणापासूनच परिश्रम करून स्वत:चे अस्तित्व रेखाटत गोरगरिबांच्या पाल्यांसाठी शिक्षणसंस्था उभारणारे मंगरुळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते हिरामन निवृत्ती इंगोले यांच्याशी त्यांच्या जीवनप्रवासासह कार्यकतृत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी साधलेला संवाद......
प्रश्न: शिक्षणसंस्था सुरु करण्याचा विचार मनात कसा आला ? उत्तर: डोळ्यांनी अंध असताना लहानपणी विविध ठिकाणी काम करताना गरीबांच्या विदारक स्थितीच्या चर्चा कानावर पडत होत्या. शिक्षणाअभावी त्यांना काय अडचणी येत आहेत. ते कळले होते. त्यामुळेच शाळा उघडून गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचा निर्धार केला होता.
प्रश्न: शिक्षण संस्था उभारताना आलेल्या अडचणींचा सामना कसा केला ?उत्तर: विचार आणि निर्णय चांगला असला की, ध्येय गाठणे कठीण नसते. सुरुवातीच्या काळात शाळेची मान्यता मिळविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यात काही लोकप्रतिनिधींचे सकारात्मक सहकार्य मिळाले आणि मान्यता मिळाल्यानंतर संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेचा (पहिली ते सातवी) श्रीगणेशा झाला. त्यानंतर विविध स्वरुपात समाजातील विविध लोकांनी मदत केली. त्यामुळे फारशा अडचणी आल्याच नाहीत!
प्रश्न: शिक्षण संस्थेत काही सुधारणा केल्या का ?उत्तर: गरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी केवळ शाळा सुरू करून चालणार नव्हते, तर त्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे, हेसुद्धा मोठे आवाहन होते. सुरुवातीला ताट्यांच्या आधारे सुरू केलेली शाळा आता इमारतीत परावर्तित केली आहे. त्याशिवाय मुलांसाठी वसतीगृहही सुरू केले आहे. पुढे या गरीब विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत संगणक शिक्षणही देण्याचा मानस आहे. शिक्षकांकडून नाही घेतली दमडी !अनेक खासगी संस्था शिक्षक भरती करताना लाखो रुपये देणगी त्यांच्याकडून घेतात; परंतु हिरामन इंगोले यांनी त्यांच्या अनुदानित शाळेवर शिक्षकांना कायम करताना एक रुपयाही देणगी स्वीकारली नाही. स्वत: अंध असूनही गरिबांच्या लेकरांना शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे धाडस हिरामण यांनी करून दाखविले, त्याचप्रमाणे गोरगरीब होतकरू युवकांना संस्थेत शिक्षक म्हणून रुजू करून घेतले