लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बॅरेजमध्ये गेलेली ५८ गुंठे शेतजमिन सातबारा उताºयावरून कमी करण्यासाठी शेतकºयाकडून अडीच हजारांची लाच स्विकारताना जयपूर साजाचे (ता.जि. वाशिम) तलाठी गजानन यादवराव गांजरे (वय ५२ वर्षे) यांना लाचलूचपत विभागाने सोमवार, १० फेब्रूवारीला रंगेहात जेरबंद केले.याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदाराच्या कुटूंबातील ५८ गुंठे शेतजमिन बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात गेलेली आहे. सदर जमीन सातबारा उताºयावर कमी करण्यासाठी तलाठी गजानन गांजरे यांनी तक्रारदारास तीन हजार रुपयांची लाच मागितली. यासंदर्भातील तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या चमुने ६ फेब्रूवारी २०२० रोजी पडताळणी केली असता, तलाठ्याने ५०० रुपये स्विकारल्याचे निदर्शनास आले. तसेच उर्वरित रक्कम १० फेब्रूवारी रोजी देण्याचे ठरले. त्यानुसार, लाचलुचपत विभागाने वाशिम शहरातील सिव्हील लाईनस्थित तलाठ्यांच्या खासगी कार्यालयात सापळा रचून पाळत ठेवली असता, तलाठी गांजरे यांनी तक्रारदाराकडून उर्वरित अडीच हजारांची रक्कम स्विकारल्याचे निदर्शनास आले. यावेळी भ्रष्ट तलाठ्यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, उपअधिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निवृत्ती बोºहाडे, अमोल इंगोले, नितीन टवलारकर आदिंनी केली.
अडीच हजारांची लाच घेताना तलाठी जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 4:36 PM