वाशिम, दि. ५- खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार नोंदविण्यासाठी तक्रारदाराकडून सहा हजाराची लाच स्वीकारताना राहुल जंगबहाद्दूरसिंह ठाकूर नामक तलाठय़ाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही घटना गुरूवार, ५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. वाशिम तालुक्यातील कळंबा महाली येथील तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांनी खरेदी केलेल्या जमिनीची फेरफार नोंद करण्यासाठी कर्तव्यावर असलेले तलाठी राहुल ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर यांनी तक्रारदार यांना फेरफार नोंदविण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली; मात्र तक्रारदाराने संबंधित तलाठी लाच मागत असल्याने वाशिम येथील लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार नोंदविली. दरम्यान, तलाठी ठाकूरने आधी एक हजार रुपयाची लाच स्वीकारली. त्यानंतर उर्वरित सहा हजाराची रक्कम गुरुवारी स्वीकारली. यावेळी लाचलुचपत विभागाने ठाकूर यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून त्यांना अटक केली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश चिमटे, पोलीस उपअधीक्षक आर. व्ही. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ए. जी. रूईकर यांनी केली.
सहा हजारांची लाच घेताना तलाठी जेरबंद!
By admin | Published: January 06, 2017 2:23 AM