वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यात दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबविली जात आहे. यामाध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व गरजू युवक-युवतींना हक्काचा रोजगार मिळवून देणे व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लाभार्थी निवडीकरिता २३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तालुकास्तरीय रोजगार मेळाव्यांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना तीन महिने निवासी प्रशिक्षण देण्यात येते. तसेच प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी मदत केली जाते. याकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. किमान १८ ते ३५ वयोगटातील दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. इच्छुक उमेदवार हा दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा सदस्य असावा किंवा बचत गटातील कुटुंबाचा सदस्य असावा. मनरेगाचे जॉबकार्ड असलेल्या कुटुंबातील सदस्यालाही या योजनेचा लाभ घेता येईल.
दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनांतर्गत २३ नोव्हेंबर रोजी मानोरा पंचायत समिती सभागृह, २४ नोव्हेंबरला वाशिम पंचायत समिती, २७ नोव्हेंबरला मंगरूळपीर, २८ नोव्हेंबरला मालेगाव, २९ नोव्हेंबरला कारंजा; तर ३० नोव्हेंबरला रिसोड पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय मेळावे होणार आहेत, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कळविण्यात आले आहे.