मालेगाव : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम, शिक्षण विभाग पंचायत समिती मालेगांव विज्ञान अध्यापक मंडळ मालेगावच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २७ डिसेंबर रोजी बाल शिवाजी विद्यालय मालेगाव येथे एकदिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आणि अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
'शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम' हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय असून, 'आरोग्य व सुदृढ आरोग्य', 'संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा', 'कचरा व्यवस्थापन आणि जलाशयांचे संरक्षण', 'वाहतूक आणि दळणवळणावरील तांत्रिक समाधान', 'गणितीय प्रतिकृती' हे उपविषय आहेत. त्याचप्रमाणे अपूर्व विज्ञान मेळाव्याचा विषय 'टाकाऊ वस्तूपासून छोटे छोटे विज्ञान प्रयोग तयार करणे' हा आहे. प्रदर्शनामध्ये सहावी ते आठवी पयंर्तचा प्राथमिक गट, तर नववी ते बारावीपयंर्तचा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी गट असणार आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती गटांमध्ये प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक अशी दोन गट आहेत. लोकसंख्या शिक्षणातही प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक असे दोन गट आहेत. प्रयोगशाळा परिचर किंवा सहाय्यक यांचा प्रायोगिक साधन गट अशा विविध गटात सदर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाने पाचवी ते बारावीपयंर्तचे विद्यार्थी अपूर्व विज्ञान मेळाव्यात सहभाग घेऊ शकतात. अशा पद्धतीने एका प्रतिकृतीसोबत एका विद्यार्थ्यांने व एका शिक्षकांनी आपला प्रयोग घेऊन उपस्थित राहावे तसेच मालेगांव तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक,पालक यांनी प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन मालेगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, विस्तार अधिकारी एस. वाय, पाटिल व विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष चव्हाण आणि सदस्य ब्रह्मन्न्नद अंभोरे यांनी केले आहे.