वाशिम : पावसाळ्यात शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे जलसुरक्षकांना तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. १० जूनपासून सदर प्रशिक्षण सुरू झाले असून, १५ जूनपर्यंत प्रशिक्षण चालणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठा नियमित होण्याच्या दृष्टीने जलसुरक्षकांचे एक दिवशीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण तालुकास्तरावर घेतले जात आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जलसुरक्षकांना शुद्ध पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा व मंगरूळपीर येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण घेतले असून, मानोरा पंचायत समितीचे प्रशिक्षण १५ जून रोजी घेण्यात येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे संरक्षण, सार्वजनिक स्त्रोताचा परिसर स्वच्छ ठेवणे, स्वच्छता सर्वेक्षण, पाण्याचे नियमित शुद्धीकरण, जैविक व रासायनिक पाणी नमुने तपासणी, लोकसहभाग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान या कार्यशाळेच्या निमित्ताने सर्व जलसुरक्षकांना प्रमाणपत्र व ओळखपत्रांचे वितरण करण्यात येत आहे.
जलसुरक्षकांना तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे धडे !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 1:58 PM