- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस ७ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध असून अन्य जलस्त्रोतही कोरडे पडत चालले आहेत. यामुळे जवळपास सर्वच गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी पाणीटंचाई निवारण उपाययोजनांतर्गत १६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरविणे सुरू झाले आहे; मात्र हैद्राबाद, लातूर येथील कंत्राटदारांनी अद्याप ‘पासवर्ड’ न दिल्याने सर्वच टँकर ‘जीपीएस लोकेशन’च्या बाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यंदा राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये उद्भवलेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता, पाणीटंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाºया उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक विभागाने आदर्श आचारसंहिता शिथिल केली. यामुळे सद्या विहिर अधिग्रहण, विशेष नळ दुरूस्ती, टँकरने पाणीपुरवठा अशा सर्वच प्रकारच्या उपाययोजना तत्काळ अंमलात आणल्या गेल्या आहेत. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातील बाभूळगाव, माळेगाव, अंजनखेडा, खैरखेडा, करंजी गरड, बिबखेडा, मांडवा, सनगाव, कळंबा बोडखे, धानोरा, बिटोडा भोयर, उज्वलनगर, गलमगाव, दादगाव, गिर्डा आणि धोत्रा देशमुख अशा १६ टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. यातील करंजी गरड आणि बाभूळगाव या दोन गावांमध्ये शासकीय टँकरने; तर अन्य १४ गावांमध्ये हैद्राबाद येथील मोतीलाल काबरा आणि लातूर येथील अन्नाराव संभाजी लाड नामक कंत्राटदारांचे टँकर लावण्यात आले आहेत. सर्व टँकरमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा कार्यान्वित आहे; परंतू संबंधित कंत्राटदारांनी त्याचे ‘पासवर्ड’ अद्याप दिले नसल्याने टँकरचे लोकेशन कळणे अवघड झाले आहे. परिणामी, टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने होत असलेल्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टंचाईग्रस्त गावांमधील टँकर ‘जीपीएस लोकेशन’च्या बाहेरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 4:07 PM