राजूर : येथील पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही, अद्याप टँकरच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. किरकोळ त्रूटी असल्याचे कारण समोर करून हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून प्रशासन दरबारी पडून आहे. दरम्यान, टँकरद्वारे तातडीने राजूरा येथे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी मालेगाव तहसिलदारांकडे शनिवारी केली. गत काही वर्षांपासून राजूरा येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता मार्च महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मे महिना संपत आला तरी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. गावात जलस्त्रोत नसल्याने दूरवरून गावकऱ्यांना पाणी आणावे लागत आहे. रात्री-अपरात्री जागून पिण्याचे व वापराचे पाणी आणण्यसाठी लहान बालकांपासून ते आबालवृद्धांना कसरत करावी लागत आहे. मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचेवतीने टँकरचा प्रस्ताव तहसीलकडे दाखल करण्यात आला. मात्र या प्रस्तावात त्रूटी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून धुळ खात पडला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनिष दत्तराव मोहळे, यशवंत हिवराळे, शिवा वामनराव खराटे यांनी मालेगावचे तहसिलदार राजेश वजीरे यांची २० मे रोजी भेट घेवून पाणी समस्या कथन केली. सोबतच गावाला तत्काळ टँकरव्दारा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी तहसिलदार वजीरे यांनी उपस्थितांसमक्ष वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून राजूरा येथील टँकरचा प्रस्तावाबाबत माहिती घेतली. येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत टँकरचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही वजीरे यांनी शिस्टमंडळाला दिली.
टँकरचा प्रस्ताव लालफितशाहीत !
By admin | Published: May 21, 2017 1:47 PM