वाशिम : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत चालू आर्थिक वर्षात २०४ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट मिळाले आहे.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे जिल्ह्यातील मातंग समाजातील १२ पोटजातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. चालू आर्थिक वर्षात बीज भांडवल योजनेअंतर्गत ४ लाभार्थ्यांना ५० हजार रुपये ते ५ लाख रुपयेपर्यंत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह २० टक्के व लाभार्थी सहभाग ५ टक्के तसेच बँकेचा कर्जाचा सहभाग ७५ टक्के असणार आहे. अनुदान योजनेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचा कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येतो. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये असून उर्वरित कर्ज बँकेचे असते. या योजनेचे २०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या दोन्ही योजनाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी जातीचा व उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधारकार्ड, प्रकल्प अहवाल यासह महत्वाच्या कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय वाशिम येथे प्रस्ताव सादर करावे, असे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत २०४ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:45 PM