कारंजा लाड, दि. १२- २0१५-१६ आर्थिक वर्ष संपत आले असून, शासकीय कार्यालयांनी थकीत कर्जवसूलीला वेग दिला आहे. येथील नगर पालिकेने तर करवसूलीसाठी अजब फंडा अवलंबविला आहे. मालमत्ता कर थकबाकीदारच्या घरासमोर बँड वाजवून त्याला कराचा भरणा करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याने या उपक्रमाबद्दल नागरिकांत कुतूहल निर्माण झाले आहे. चालू आर्थिक वर्षात कारंजा नगरपरिषदेचे सरासरी ४ कोटी २५ लाख रूपये वसूली उद्दिष्ट आहे. नोटाबंदीच्या काळात मोठय़ा संख्येने थकबाकीदारांनी कराचा भरणा केला आहे. तरीही अद्याप २ कोटी २५ लाख रुपये करापोटी वसूल होणे बाकी आहेत. या पृष्ठभूमीवर कर वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाने नोटीसा, सूचना देऊनही थकबाकीदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्याधिकारी वानखडे यांनी करवसूलीचा वेगळाच फंडा शोधून काढला आहे. ज्यांच्याकडे नगर परिषदेचा मालमत्ता कर थकबाकी आहे त्याचे घर अथवा प्रतिष्ठानासमोर बँड वाजविल्या जातो. थकबाकीदारला संकोच वाटतो व तो मालमत्ता कर भरणा करण्यास प्रवृत्त होतो. त्यामुळे असल्याने वसूलीचा हा फंडा कितपत यशस्वी होतो, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.
-नगरपरिषद हद्दीतील करधारकांना सूचना, नोटीसा देवूनही काही जण याकडे टाळाटाळ करीत असल्याने हा उपक्रम हाती घेण्याची वेळ आली. या उपक्रमाचा चांगलाच फायदा झाला असून थकबाकीदार कराचा भरणा करतांना दिसून येत आहे. कर भरणार्यांचा असाच फ्लो राहिल्यास मार्च महिन्याच्या शेवटपयर्ंत थकित करवसूलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.
- प्रमोद वानखडे मुख्याधिकारी, नगरपरिषद कारंजा