लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेस ६ मे रोजी प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे. शहरी आरोग्य केंद्र येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या उस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ए. जी. हाके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली मुंदडा, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. आहेर म्हणाले, क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक घटकाच्या सहकार्याची गरज असून प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करून क्षयरुग्णांची माहिती द्यावी तसेच आशा कार्यकर्ती व आरोग्य सेवक, सेविका यांनी प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेदरम्यान काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेमुळे क्षयरुग्ण नोंदणी होण्याचे प्रमाण वाढेल व क्षयरोगाबद्दल जनजागृती होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचारी, त्यांचे भागधारक, अशासकीय संथ तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील कमर्चारी यांची पथके नेमून दिलेल्या भागात घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहेत. या मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील झोपडपट्टी परिसर, पोहोचण्यासाठी अवघड गावे आणि वस्त्या, कारागृहातील कैदी, ज्या गावात रुग्ण जास्त असू शकतात अशी गावे, एचआयव्ही अतिजोखीम गट, असंघटीत कामगार, बांधकाम श्तालाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर अशा निवडक भागांमध्ये क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सुमारे २६९ पथकांद्वारे जिल्ह्यातील २६ हजार ६५८ घरांना भेटी दिल्या जाणार आहेत, असे डॉ. हाके यांनी प्रास्ताविकात सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लोनसुने यांनी केले, तर आभार डॉ. जिरोणकर यांनी मानले.
वाशिम जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेस प्रारंभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 6:05 PM