लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील १६ परीक्षा केंद्रांवर रविवार, १९ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. सदर परीक्षा जिल्हयातील ५५७८ परीक्षार्थी देणार आहेत. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत पेपर क्रमांक १ आणि दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत पेपर क्रमांक २ साठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ३१६५ विद्याथी पेपर क्रमांक १ व २३८३ विद्यार्थी पेपर क्रमांक २ ची परीक्षा देणार आहेत. तर काही विद्यार्थी दोन्ही पेपर देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात १९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. शहरातील लॉयन्स विद्यानिकेतन, रेखाताई कन्या विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालय, समर्थ इंग्लिश स्कूल, नवोदय विद्यालय, विद्याभारती माध्यमिक स्कूल, मुलीबाई चरखा इंग्लिश स्कूल, माउंट कारमेल स्कूल, नारायणा किड्स, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, बाकलीवाल विद्यालय, राजस्थान आर्य कॉलेज येथील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.या परीक्षा केंद्रांवर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षा केंद्रांवर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी व शिक्षणाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी सोडून इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. (प्रतिनिधी)
वाशिम जिल्हयातील ५५७८ विद्यार्थी देणार शिक्षक पात्रता परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 3:12 PM