लोकमत न्यूज नेटवर्करिसोड - मार्च २०१७ पासून वेतन न मिळाल्याने हतबल झालेल्या प्राथमिक शिक्षकांनी रिसोड पंचायत समिती कार्यालयासमोर २२ मे पासून साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवर कार्यरत शिक्षकांचे वेतन नियमित न मिळणे ही नित्याचीच बाब झाली आहे. अन्य पंचायत समितींतर्गतच्या शिक्षकांचे वेतन नियमित मिळत असताना, रिसोड पंचायत समिती प्रशासन नियमित वेतन का करू शकत नाही, असा सवाल प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित केला. मार्च २०१७ पासूनचे वेतन देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी वारंवार केली. मात्र, अद्याप या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजाने शिक्षक संघटनांनी सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी शिक्षक संघटना, साने गुरूजी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना यासह अन्य शिक्षक संघटनांचे पदाधिकारी या साखळी उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत. अविनाश देशमुख, संतोष सपकाळ, डी.एन. बिल्लारी, प्रशांत देशमुख, विकास बोरकर, दत्तराव बकाल, गजानन बुंधे, ब्रह्मानंद वानखडे, शिवाजी खडांगळे, सतीश घुगे, सुधाकर नागे, मधुकर बाजड, शंकर तहकिक, सुनील पांडे, किशोर वाणी, प्रभाकर आपोतीकर, अमित भुजबळ, सुभाष शिंदे, स.मा. बोरकर आदी शिक्षक साखळी उपोषणाला बसले आहेत.
वेतनासाठी शिक्षकांचे साखळी उपोषण
By admin | Published: May 22, 2017 6:55 PM