वाशिम : अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांची वेतनश्रेणी व समायोजनाची प्रक्रिया रखडल्याने याचा फटका राज्यातील हजारो शिक्षकांना बसत आहे. वेतनही नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत.राज्यातील शाळांमधील अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राज्य शासनाने अपंग समावेशीत शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. मध्यंतरी शासनाने अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले होते. यावर शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने उच्च न्यायालयाच्या २००९ च्या निर्णयाने अपंग समावेशीत शिक्षकांना सुद्धा महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती अधिनियम १९८१ लागू असल्यामुळे या शिक्षकांच्या सेवा समाप्त करता येत नाहीत असे आदेश दिले होते. या आदेशानुसार अशा शिक्षकांना पुनर्स्थापित करण्यात आले. या शिक्षकांना सेवासातत्य, वेतनश्रेणी लागू करून समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटना तसेच संस्थाचालकांकडून वारंवार करण्यात आली. परंतू, याबाबत शासनस्तरावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. बरीच वर्षे सेवा होऊनही तसेच महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्थी अधिनियम १९८१ लागू असूनही त्यांना सेवासातत्य व वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही. अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक यांनी २१ जानेवारी रोजी केली.
अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांची वेतनश्रेणी, समायोजनाची प्रक्रिया रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 6:20 PM