लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शाळानिहाय निव्वळ रिक्त जागांच्या माहितीची जुळवाजूळव करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, २१ मे पासून यादीवरील हरकती निवारण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.गतवर्षीपासून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आॅनलाईनची जोड मिळाली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांंतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीव्दारे करण्यासाठी शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सुधारीत धोरण निश्चित केले होते. मात्र, त्यानंतर याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल झाली आणि त्या अनुषंगाने बदली प्रक्रियेचा २७ फेबु्रवारी २०१७ रोजीच्या आदेशातील बदलीपात्र शिक्षकांच्या व्याख्येतही बदल झाला. बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची बदलीस निश्चित धरावयाची सेवा १० वर्ष पुर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत त्या शिक्षकांची सेवा किमान तीन वर्ष पूर्ण झाली आहे, असा बदल ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी केला. या बदलानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शाळानिहाय निव्वळ रिक्त जागांच्या माहितीची जुळवाजूळव १३ मे पासून सुरू झाली असून, २० मे पर्यंत शाळानिहाय निव्वळ रिक्त जागा घोषिण केल्या जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने पंचाय समितीनिहाय शाळांमधील निव्वळ रिक्त जागांची माहिती मागविली आहे. या माहितीची जुळवाजूळव करण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची एकच धांदल उडाली असून, २० मे पर्यंत संपूर्ण माहिती सादर करावी लागणार आहे.(प्रतिनिधी)
शिक्षक बदली प्रक्रिया; शाळानिहाय रिक्त जागांच्या माहितीची जुळवाजूळव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 3:15 PM