लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सेवेतून काढून टाकण्याचे व संबंधितांचे वेतन थांबविण्याची बाब प्रस्तावित होती; मात्र या धोरणास राज्यभरातून तीव्र स्वरूपात विरोध झाल्यामुळे अखेर ७ मे रोजी शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण संचालनाकांकडे पत्र पाठवून १३ फेब्रूवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तुर्तास सेवेतून काढू नये. तसेच संबंधितांचे वेतनही थांबवू नये, असे आदेश दिले आहेत.इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या तथा ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्यास राज्यभरातील शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे शासनाने निर्णय रद्द ठरवत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव स्वप्निल कापडणीस यांनी मंगळवारी परिपत्रकाच्या माध्यमातून संबंधित शिक्षकांचे पगार अडवू नये. यासह त्यांना कामावरून देखील कमी करू नये, असे आदेश दिले आहेत. ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त संधी देण्यात यावी, असेही कापडनिस यांनी यासंदर्भातील पत्रात नमूद केले आहे. यामुळे केवळ ‘टीईटी’ उत्तीर्ण नसल्याने सेवा समाप्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.‘टीईटी’चा अभ्यासक्रम नियोजित नसल्यामुळे शिक्षकांच्या गुणवत्तेचे मोजमाप केवळ ‘टीईटी’ने होऊ शकत नाही. त्यामुळे ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे पगार थांबविणे, त्यांना अचानक सेवेतून काढून टाकणे ही बाब अनुचित असल्याची बाब शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिवांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत अवर सचिवांनी राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे.- शेखर भोयरसंस्थापक, शिक्षक महासंघ, अमरावती
‘टीईटी’ उत्तीर्ण नसणारे शिक्षक सेवेत राहणार कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 4:54 PM