लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य दरात होणे आवश्यक आहे. दरम्यान, रास्तभाव दुकानांमध्ये अन्नधान्याचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक रास्तभाव दुकानावरील धान्य वितरणाचे संनियंत्रण करण्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकाधारकांची ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करून अन्नधान्य वितरण केले जाते; मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदाराने स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची कार्यवाही करण्याची सुविधा लॉकडाऊन कालावधीत करण्यात आली. या पद्धतीने धान्य वितरण होताना गैरप्रकार होवू नये, यासाठी रास्तभाव दुकानदारांना सूचना देण्यात आल्या. तरीही धान्य वितरणाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्याने रास्तभाव दुकानातील धान्य वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे वितरण गतीने व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
अन्नधान्य वितरणाचा दैनंदिन अहवाल देणार रास्तभाव दुकानावर नियुक्त केले जाणारे शिक्षक, कर्मचारी यांनी शिधापत्रिकाधारकांना योजनानिहाय दिले जाणारे धान्य, आकाराला जाणारा दर, धान्याची पावती, धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी आखणी, मोफत धान्य वाटपाची कार्यवाही आदी बाबींवर नियंत्रण ठेवायचे आहे. तसेच दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधित तालुक्याच्या पुरवठा शाखेस ई-मेल अथवा व्हाटसअॅप संदेशाद्वारे सादर करावयाचा आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.
जिल्ह्यातील गरजू नागरिकांना रास्त भाव दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंचा योग्यरित्या पुरवठा व्हावा, त्यात कुठल्याच प्रकारे गैरप्रकार होऊ नये, यासाठी दक्षता बाळगण्यात येत असून धान्य वितरण संनियंत्राची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात येणार आहे.- राजेंद्र जाधवजिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम