लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी ३ व ४ डिसेंबर रोजी अमरावती येथे झाली. शेवटच्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईक हे विजय घाेषित करण्यात आले. त्यांच्या विजयामुळे शिक्षकांनी शाेधला अपेक्षेचा नवा ‘किरण’ असे बाेलल्या जात आहे. शिक्षक आमदाराचा पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्याला बहुमान मिळाला आहे. त्यांच्या विजयामुळे शिक्षकांत आनंद व्यक्त केल्या जात आहे.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच किरण सरनाईक आघाडीवर हाेते. तसेच दुसऱ्यासह इतर पसंती उमेदवारामध्येही त्यांचीच आगेकूच हाेती. अॅड. किरण सरनाईक यांना राजकीय वारसा असून, त्यांच्या मातोश्री स्व. मालतीताई सरनाईक यादेखील आमदार होत्या तर वडील स्व. रामराव सरनाईक हे प्रख्यात वकील होते. रिसोड तालुक्यातील चिखली सरनाईक येथील रहिवासी असलेले अॅड. किरण सरनाईक हे श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष आहेत. या संस्थेंतर्गत जवळपास १३ शाळा व महाविद्यालय असून, शिक्षण क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध आहे. किरणराव सरनाईक अमरावती विभागातील संस्थाचालक मंडळाचे विभागीय अध्यक्ष राहिले असून, अकाेला जिल्ह्यात युवक काॅंग्रेसचे माजी अध्यक्षही हाेते. त्यांचे वडील विदर्भ काॅंग्रेस कमिटीचे महासचिव हाेते.सरनाईक यांनी दोन वर्षांपासूनच अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. त्यांच्या विजयाची वार्ता जिल्ह्यात धडकताच शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शिक्षकांनी शोधले अपेक्षेचे नवे ‘किरण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 12:56 PM