दादाराव गायकवाड / कारंजा लाड (जि. वाशिम): वाशिम जिल्हय़ातील जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत मिळून अधिव्याख्यात्यांची १४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतानाही पदभरती बंद असल्याचे कारण समोर करून ही पदे भरण्याचे प्रयत्न जिल्हा परिषदेकडून करण्यात येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे. शासनाच्यावतीने गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेची ११ आिण १२ वीपर्यंतची कनिष्ठ महाविद्यालये स्थापन केलीत. राज्यभरात ठिकठिकाणी असलेल्या या महाविद्यालयांतून लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात; परंतु या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अधिव्याख्यातेच नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र वाशिम जिल्हय़ात दिसत आहे. वाशिम जिल्हय़ात वाशिम, मंगरुळपीर, कामरगाव, उंबर्डा बाजार आणि विठोली येथे जिल्हा परिषदेची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या पाचही महाविद्यालयात मिळून आजच्या घडीला हजाराच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; परंतु या पाचही ठिकाणच्या महाविद्यालयातील अधिव्याख्यात्यांची अनेक पदे रिक्त आहेत. या महाविद्यालयांतून घेतलेल्या माहितीनुसार वाशिम येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात जीवशास्त्र (बॉयलॉजी), भौतिकशास्त्र ( फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या तीन विषयांची मिळून तीन पदे ५ वर्षांपासून रिक्त आहेत. मंगरुळपीर येथील कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या चार विषयांची मिळून तीन पदे रिक्त आहेत. त्यापैकी भौतिकशास्त्राच्या शिक्षकाचे पद १0 वर्षांपासून, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या शिक्षकांचे पद जवळपास सात वर्षांपासून, तर गणित या विषयाच्या अधिव्याख्यात्याचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे
शासकीय कनिष्ठ महाविद्यालयांत शिक्षकांची वाणवा
By admin | Published: August 14, 2015 1:01 AM